रोज एक पान_७_संकल्प
![]() |
| Image Courtesy: Pixabay |
नमस्कार, आज खूप दिवसांनी हे पान लिहायला घेतले... माझ्या 'रोज एक पान' ह्या सदराची संकल्पना वाचली असेल तर तुमच्याही लक्षात आलं असेल की छोट्या छोट्या कित्येक गोष्टी ह्या सदरातून उलगडण्याचा माझा प्रयत्न असतो... हाच 'प्रयत्न' आजच्या पानाचा विषय असला पाहिजे असं ह्या नवीन वर्षात आल्यावर मनापासून जाणवतंय...
सालाबादप्रमाणे ह्या वर्षाच्या स्वागतालाही प्रत्येकानेच आपापल्या मनाप्रमाणे तयारी केली असेल. त्याच उत्साहात नवीन वर्ष सुरू झालेले आहे.... पण आज केवळ आठवड्यानंतर एक गोष्ट किती जणांनी खरोखर लक्षात ठेवली आहे? ती म्हणजे नववर्षाच्या फक्त पहिल्या दिवशी आवर्जून एका गोष्टीची प्रत्येकाला आठवण असते आणि एकमेकांना त्या विषयी प्रश्न ही विचारला जातो... अन् तो म्हणजे "ह्या वर्षीचा संकल्प काय आहे ?"...काय खरं आहे ना? तुम्हाला कोणी किंवा तुम्ही कोणाला तरी हे विचारलं असेलच...
तुम्ही काय संकल्प केला ? मी काय केला ह्या विषयी मला काही चर्चा करायची नाही. पण एक साधा विचार आला म्हणून हे आजचं साधं पान सर्वांसाठी घेऊन आले...इतर पानांप्रमाणे हेही पान तुम्हाला आवडेल अशी आशा करते.
खरं बघायला गेलो तर हा प्रश्न एकमेकांना विचारण्यापेक्षा स्वतःच स्वतःला का विचारू नये ? आणि त्याचं उत्तरही स्वतःलाच का बरं देऊ नये? हो... खरंच... काय हरकत आहे ? बघा, आत्तापर्यंत केलेल्या संकल्पांची यादी करून पाहूया.. त्यातले किती आणि कधी पूर्ण केले.. ह्याचं उत्तर आपल्याला ती यादी बघूनच मिळेल नाही का?
सर्वच जण काही ना काही संकल्प करतात आणि मग काहींना कालांतराने त्याचा विसर पडतो आणि ते संकल्प काही सिद्धीस जात नाही.. हे मी कोणाला उद्देशून नाही तर आपल्या सर्वांविषयीच बोलत आहे कारण हा कोणा एकाचा नाही तर साऱ्या मनुष्य जातीचाच फक्त मुद्दाच नसून सवय झाली आहे...
आपले अगदी साध्यातले साधे संकल्प जरी पूर्ण झाले नाही की आपण म्हणतो... असे संकल्प करून काही होत नाही.. काही दिवस त्यावर काम करतो कालांतराने मनुष्यातला आळशी प्राणी जागा होतो आणि मग सुरळीत चालू असलेल्या गोष्टी हळूहळू कमी होऊन थांबून जातात.... पण मग ह्याचं कारण शोधणारे अगदी मोजकेच...
खरं आहे हे.. आपण ज्या अर्थी एखाद्या गोष्टीचा संकल्प करतो; ह्याचाच अर्थ आपण त्या गोष्टी करू शकतो ह्यावर त्यावेळी आपलाच विश्वास असतो ना.. मग तोच विश्वास नंतर कुठे कमी पडतो. हे आपणच आपलं शोधायला हवे.
कधी कामाच्या व्यापात वेळच नाही मिळत असं आपल्यातला प्रत्येक जण कधी ना कधी बोलतोच.. पण मग तेव्हा आपण हा विचार का नाही करत की, जेव्हा आपण कुठलाही संकल्प करतो तेव्हाही आपल्याला येत्या वर्षात आपल्या कामांचा व्याप माहीत होताच ना.. तरी आपण सगळ्याचा विचार करूनच ते संकल्प केलेले असतात. मग आता वेळ नाही असं बोलून तो संकल्प का बाजूला सारतो.... विचार करण्यासारखी बाब आहे ना..
म्हणूनच संकल्प जरूर करावे पण ते पूर्णही नक्कीच करावे.. आणि हे सर्व आपल्याच हातात आहे.. त्यासाठी पूर्वापार ऐकत आलेली म्हण कायम लक्षात असावी ती म्हणजे - ' प्रयत्नांती परमेश्वर '......
एकदा का संकल्प सोडला की त्यासाठी काय काय करावं लागेल ह्याची नोंद आपणच घ्यायला हवी..
आपल्या इच्छांना प्रयत्नांची जोड दिली तर संकल्प नक्की पूर्ण होतील ह्याची खात्री बाळगूया आणि तो संकल्प फक्त सिद्धीस न नेता तो जगायलाही लागलो तर आपल्या कुठल्याच इच्छा अपूर्ण राहणार नाहीत...
आणि त्यासाठी सर्वात आधी वेळच मिळत नाही.. हा विचार आपण सोडूया.... किती लोक कित्येक कामं एकावेळी करत असतात. मग त्यांना वेळ पुरतो ना.. सगळ्यांकडेच दिवसाचे २४ तास असतात मग आपण वेळ नाही बोलून काही गोष्टी पुढे ढकलणे थांबवायला हवे.
दुसरी गोष्ट म्हणजे 'संयम'. तो अंगी बाणायला हवा.. ज्या गोष्टींना जितका वेळ लागणार असतो तो लागतोच.. पण म्हणून एवढं सगळं करूनही माझं काम होत नाही बोलून चिडचिड करतो, निराश होतो. प्रसंगी काही जण हळू हळू ते काम करणं उद्यावर सोडून देतात. पण त्यावेळी ते फक्त कंटाळा करणं नसतं तर ते थांबणं असतं आणि म्हणूनच ते संकल्प पूर्ण होत नाही....
आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'नियोजन'. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे एक नियोजन वही तयार कारणे. आपली जी काही कामं इच्छा, ध्येय, संकल्प असतील ती आपल्याला वाटत असणाऱ्या क्रमाने लिहून ठेवणे, त्या हर एक कामासाठी स्वतःच मुदत ठरवणे , आणि हेच नियोजन वेळोवेळी वाचून त्यावर काम करणे ह्या सवयी अंगिकारल्या तर कुठलंही कामं करणं सोपे होईलच शिवाय एक प्रकारची शिस्त आपण स्वतःला लावू शकतो..
काम मग ते कुठलंही असो.. केवळ जिद्दच नाही; सोबत वेळेचा सदुपयोग करणं जमलं तर आयुष्यात अशक्य असे काहीच नाही... त्याकरता स्वतःच स्वतःला शिस्त लावूया.. कुठलीही गोष्ट असो..दिवसातला किमान काही वेळ त्या त्या गोष्टीला देवूया..
उदा. वाचन. आपण कित्येक वेळेला म्हणतो; घरात एवढी पुस्तकं आहेत पण वाचूनच होत नाही.. पण का? हे आपण आपल्यालाच का विचारत नाही? दिवसभरात आपण आपली महत्त्वाची कामे सोडली तर उरलेल्या वेळात काय करतो ह्याचा विचार करा. जर आपल्याला मिळालेल्या प्रत्येक मोकळ्या वेळात आपण सवयीने हातात भ्रमणध्वनी घेतो.. त्यावर वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचं मनोरंजन करतो... आणि तो मिळालेला ५ मिनिटांचा वेळ कित्येकदा अर्धा तास गेला तरी लक्षात येत नाही.... पण तोच वेळ जर आपण किमान एक दोन पानं वाचण्यासाठी दिला तर हीच आपली वाचायची राहिलेली पुस्तकं सुद्धा वाचून पूर्ण होतील.. आणि एकदा का ह्याची सवय लागली की आपल्यालाच आपला वेळ नियोजित करणं खूप सोपं जाईल.
हे एक उदाहरण झालं. पण अशी कित्येक छोटी - मोठी कामे पर्यायाने आपले संकल्प आपण ह्याचं सवयीने पूर्ण करू शकतो... तेव्हा ह्या नवीन वर्षातला संकल्प काहीही असो; सर्वात आधी तो पूर्ण करण्याचा संकल्प करूया आणि त्यासाठी हे सर्व प्रयत्न करुया.. म्हणजे मग ह्या वर्षाच्या शेवटी आपले संकल्प पूर्ण झाले नाहीत ह्याची खंत राहणार नाही...
बघा, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे... ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांनाही जमवता आल्या तर मलाही आनंदच वाटेल.😊 बाकी प्रयत्नांती परमेश्वर हे आपण सारे जाणतोच..चला, तर मग कामाला लागूया, आपल्या स्वप्नांसाठी थोडा तरी वेळ नक्कीच काढूया आणि आपल्या संकल्पांचा श्रीगणेशा करूया...
🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻
तेव्हा तुम्हा सर्वांच्या छोट्या - मोठ्या अनेक संकल्पांसाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा नूतन वर्षाभिनंदन!
लवकरच भेटू अशाच एका नवीन पानावर...
आनंदी रहा...सुरक्षित रहा...🙏🏻
©✍🏻नंदिनी हाटकर.

Nice thanks. 👍
ReplyDelete