रोज एक पान_२_मोगरा फुलला...
काय मग, मागच्या पानातला बकुळगंध मनात दरवळला की नाही ? म्हणजे तुम्हांलाही अशी एखादी मनी रुजलेली आठवण आली का? आली असेल तर ती आणखी जपून ठेवा... आता आजचं शीर्षक वाचून वाटलंच असेल की आता मी नेहमी एक एक फूलांच्या आठवणी सांगायच्या असं ठरवलं की काय... तर तसं नाही.. खरं तर ह्या पुढचं पान हे वेगळ्या विषयावर लिहायचं ठरवलं होतं आणि ते पान जवळपास भरतही आलं होतं...
पण कधी कधी अचानक आलेलं वेगळं वळणही खूप आनंदाचं असतं आणि म्हणूनच चालू असलेलं पान जरा बाजूला ठेवून एक अधिकचं पान लिहायला तर हवचं... तेव्हा आजचं हे गोंडस पानही आवडलं तर जपून ठेवा...
अगदी लहानपणापासून म्हणा किंवा समजायला लागल्यापासून म्हणा; प्रत्येक जण आपापल्या आवडी वेगवेगळ्या पध्दतीने जमेल तसा जपत असतोच आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे 'मोगरा' असं मला वाटतं...
अर्थात संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगात फुललेल्या मोगऱ्याचं जसं आणि जे वर्णन केले आहे ते पुन्हां एकदा शांततेत ऐका.... त्याचा अर्थ समजून घ्या. कुठे अडत असेल तर माहीतगारांकडून समजून घ्या आणि बघा तुम्हालाही मोगरा फूललेला दिसेल.....
तर आज मोगऱ्यासाठी लिहायचं कारण एवढचं की, घराच्या खिडकीत कायम बहरलेली रोपटी लहानपणापासूनच पाहत आल्याने नंतर नवनवी रोपटी लावायची निर्माण झालेली आवड ह्या सर्वांमुळे गेली कित्येक वर्ष आमच्या घराची खिडकी वेगवेगळ्या रोपट्यांनी सजवली आहे.. त्यावर उमललेल्या पाना-फूलांनी खूप प्रसन्न वाटतं... वेगवेगळ्या फूलांची रोपं लावली..काही छान वाढली; फूलांनी बहरली.. तर काही सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे वाढायची थांबली की, थोडी निराशा वाटायची.. म्हणतात ना मनापासून इच्छा असेल आणि तशी प्रार्थना केली की, त्यासाठी हवे ते प्रयत्न केले की सगळी स्वप्न पूर्ण होतात. अशीच एक अनुभूती नूकतीच आली..
मोगरा कुणाला आवडत नाही? त्याचा मोहक सुगंध तर सदा प्रफुल्लित करणारा आनंद दरवळणारा असतो.. आणि म्हणूनच नाही का शुभ प्रसंगी, लग्न कार्यात मोगरा कायम दरवळलेला असतो... कधी गजरे आणल्यावर किंवा कधी मोगऱ्याची फूलं पाहिल्यावर नेहमी वाटायचे मोगऱ्याचं रोपही लावायला हवं.. आणि नेमकं तेव्हाच आई एक मोगऱ्याचं रोप घेऊन आली आणि एका कुंडीमध्ये त्याचीही राहण्याची सोय केली... घरात आणखी एक सदस्य आल्याने छान वाटत होतं.. बघता बघता ते हिरव्यागार पानांनी बहरू लागलं. त्याच्या वेलीही वर वर पसरत गेल्या... आता फक्त प्रतीक्षा होती ती फूलांनी मोहोरण्याची.. बरेच दिवस गेले.. खतपाणी वेळोवेळी केलं.. पण फक्त त्याच्या वेली वाढायच्या.. कधी त्याची पानं सुकून जायची..पुन्हां नवी पालवी फुटायची.. असे ४-५ वर्षे गेली... वाट पाहून थोडी निराशा वाटायची की आपण त्यांना सांभाळण्यात काही चूक तर करत नाही. पण त्या रोपट्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही... पुढे कधीतरी नक्कीच ह्यावर फूल उमलणार ही आशा बाळगून त्याचा सांभाळ केला...
अन अचानक ती प्रतीक्षा संपली.... काही दिवसांपूर्वी आपल्या सृजनाची एक छोटीशी चाहूल त्या वेलीने दिली... इतक्या वर्षांच्या मेहनत आणि प्रतीक्षेनंतर त्यावर पहिल्यांदा एक इलूशी नाजूक कळी दिसली... आम्ही सगळे अर्थातच खूप खुश झालो... आई जशी आपल्या बाळाची वाढ दरदिवशी नव्याने बघत असते.. अगदी तसचं आई आणि मी रोज त्या हळूहळू वाढत जाणाऱ्या नाजूक कळीला आवर्जून निरखू लागलो.... बऱ्यापैकी मोठी झाल्यावर रोज असं वाटायचं की उद्या फूल उमलेल... असे ३-४ दिवस गेले तरी फूल काही उमलत नव्हते.... त्या कळीला फूल रूपात यायची जेवढी घाई नसेल त्यापेक्षा जास्त उत्सुकता आम्हालाच होती.......
काल रात्री झोपायची तयारी करताना खिडकीजवळ असताना खिडकीतून आलेल्या एक मंद हळूवार गंधाने एकदम मोहून टाकले...रात्री फूलाचा सुगंध कुठून येतोय हा प्रश्न पडलाच अन दुसऱ्याच क्षणी मनाने 'युरेका युरेका' ओरडले अन मोगऱ्याची कळी पाहूया म्हणून बघितले... खरंच मोगरा फूलत होता..... खूपच आनंदी क्षण होता. लगेच घरात सगळ्यांना सांगितले हा बघा मोगरा फूलला... रात्र असल्याने ते फूल अजूनही पूर्ण उमलले नसले तरी त्याच्या हळूहळू उमललेल्या नाजूक पाकळ्या खूप सुंदर दिसत होत्या...सगळेच खूप आनंदीत झाले.... पहिल्यांदाच आमच्याघरी मोगऱ्याने जन्म घेतला होता...
इतक्या मेहनतीनंतर उमलणारं ते नाजूक फूलही खूप शिकवणारे वाटले... बऱ्याचदा आपण छोट्या छोट्या असफलतेमुळे किंवा अचानक येणाऱ्या संकटांनी, न सुटणाऱ्या प्रश्नांनी लगेच खचून जातो... सकारात्मकतेने बघणे हळूहळू गमावू लागतो... पण विश्वास आणि मनापासून इच्छा असेल तर अशा सगळ्या गोष्टी सहज हाताळू शकतो... फक्त योग्य वाट सापडायला हवी अन त्यासाठी योग्य ते पर्याय शोधायला हवे नाही का? अशीच काहीशी ह्या नाजूकशा फूलाची ही कहाणी होती...
सकाळी लवकर उठले अन आधी खिडकीपाशी गेले.. उगवत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात; आता पूर्णपणे उमललेले ताजे टवटवीत.... पांढरेशुभ्र मोगऱ्याचे फूल... त्याचा हलकासा दरवळ.... खूपच छान वाटले.. तो फूललेला मोगरा इतका सुंदर दिसत होता; अर्थातच तो क्षण टिपून ठेवण्याचा होता... लगेचच खूप दिवस बाजूला ठेवलेला कॅमेरा घेतला... मन भरेपर्यंत क्लिकक्लिकाट सुरू झाला....
हे मोगऱ्याचे फूल बाप्पाचरणी वाहून त्याचे ह्या आनंदासाठी आभार मानले.....
सद्यस्थिती लवकरच निवळावी, सर्वत्र आरोग्यदायी जीवन असावं.... आणि तुम्हा सर्वांच्या जीवनात असाच सगळा छोट्या मोठ्या गोष्टींचा मोगरा सर्वत्र कायमच दरवळावा; हिच बाप्पा चरणी प्रार्थना......
लवकर भेटूच, पुढच्या पानावर....
- © नंदिनी हाटकर.


खूपच छान... तूझ्या लिखाणाचा मोगरा असाच उत्तरोत्तर फुलू देत..हीच सदीच्छा😇
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete👍
ReplyDelete