रोज एक पान_६_लाडूवरचा बेदाणा आणि प्राजक्त

         



           कधी कधी आपल्याला अशी काही माणसं भेटतात की जे कायम इतरांपासून प्रेरित होत असतात आणि तेच इतरांनाही प्रेरित करत असतात. ह्यामुळेच जीवनाचा खरा अर्थ उलगडता येतो.  खरंच प्रत्येकाच्या संपर्कात अशी मंडळी असावीच.

       स्वतः साठी सगळेच जगतात; परंतू इतरांसाठी जगूनही 'आनंद' शोधण्यासोबत तो वाटण्यात खरी माणुसकी जपणारे अनेक हात आपल्या देशात आहे. समाजात जगताना समाजाप्रती काही कार्य केले पाहिजे हे आपण लहापणापासून शिकत असतो, ऐकत असतो. पण तरी सुद्धा खऱ्या आयुष्यात ही गोष्ट कायम जपणारे काहीच लोक असतात. समाजकल्याणासाठी आपलं आयुष्य वाहिलेल्या अनेक नामवंत, थोर व्यक्तींबद्दल आपण सारेच जाणतो.  अगदी तसेच समाजात काही अशाही वल्ली आहेत ज्या त्यांच्या इतपत जमलं नाही तरी आपापल्या परीने समाजाचं देणं फेडण्याचं काम कायमच करत असतात. अशाच एका गटाशी ४/५ वर्षांपूर्वी संपर्कात आलो. 'Joy of Giving' उपक्रमांतर्गत दिवाळीच्या निमित्ताने काही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथल्या रहिवाश्यांना दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू देऊन, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करून आनंद वाटण्याचे मोलाचे काम हा गट करतो. फक्त दिवाळीचं नाही तर संकटकाळी / आपात्कालीन परिस्थितीतही अनेकदा आपला हा गट कायम एका अलिखित मित्रत्वाच्या नात्याने फक्त मदतीचाच नाही तर आपुलकीचाही  हात पुढे करतो आणि म्हणूनच ही सारी मित्र मंडळी खरंच खूप कौतुकास्पद आहेत. कारण वेगवेगळे असे बरेच गट ह्या एका कार्यासाठी एकमेकांशी जोडले गेले असले तरी  सगळ्यांमधला एकोपा सहकार्य उल्लेखनीय म्हणता येईल. आत्तापर्यंत फक्त एकदाच त्यांच्यापैकी काहींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यानंतरही काही अपरिहार्य कारणांमुळे प्रत्यक्ष जाऊन हातभार लावता आला नाही ह्याची सारखी खंत वाटतेच.  पण तरी त्यांच्याशी असलेल्या प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष भेटी वरून एवढं म्हणू शकते की , खरंच तुम्ही सर्व खूप कौतुकास पात्र आहात. 

          आजच्या धावत्या जगात आपल्याला आपल्या जवळच्या माणसांसाठी , मित्रमंडळींसाठी वेळ काढणंही कित्येकांना जमत नाही. पण ह्या गटात जोडलेले सर्वच आपापल्या परिने योगदान देताना नेहमीच दिसतात. कोणी किती आणि कशी मदत केली हे मोजून कुणाचंच पुण्य कमी करायचं नाही. परंतु अमुक एक दिवशी जाऊन हे कार्य पार पाडले असं होत नाही. त्यासाठी कित्येक दिवस आधी पासून तयारीला लागणं असो, आपल्या संपर्कातल्या सर्वांपर्यंत त्याचा संदेश/ माहिती पोहोचवणं असो, सगळी जमावाजमव, खरेदी, सर्व साहित्याचं वर्गीकरण असो, ठरलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेट देणं असो.  अशा कित्येक गोष्टी आपले रोजचे काम, कुटुंबासोबतचा वेळ हे सगळं सांभाळून करणं खरंच सोपे नाही. ह्या सगळ्या कामांत कित्येक दिवस आणि किती वेळ सर्वांनी आवर्जून खर्चिला ह्याची गणती कोणीच करणार नाही आणि खरे तर केली ही नाही पाहिजे अन्यथा आपण वाटलेला आनंद समाधानाची झोप कसा मिळवून देईल. 

           पण तरी थोडे कौतुक हे करायला हवेच ना; म्हणूनच मनापासून सांगतेय तुम्हा सर्वांकडून अप्रत्यक्षपणे खूप शिकता येतंय. समाजातील अनेक प्राजक्त वृक्षांपैकी आपला हा गटही एक प्राजक्त वृक्षच आहे. जसा प्राजक्त फुलांचा सडा नेहमीच दुसऱ्याच्या अंगणात पडतो अगदी तसंच तुम्ही सर्व निस्वार्थी भावनेने इतरांच्या अंगणात छोटासा असला तरी आनंदाच्या रांगोळीचा सडा घालत आहात. हा प्राजक्तगंध तिथल्या मनामनांत कायमच आनंदाने दरवळत राहील ह्याची खात्री आहे.

         आणि म्हणूनच आयुष्यात प्रत्येकानेच थोडेफार लाडूवरच्या बेदाण्यासारखंही व्हायला हवं... आता तो बेदाणा लाडूचं रूप खुलवायला लावला जातो. पण नीट पाहायला गेलं तर हाच बेदाणा पदार्थातल्या मीठासारखंच काम करतो नाही.. हेच बघा जर लाडूवर बेदाणा लावला नाही तरी चालण्यासारखं असतंच पण जर कधी लाडू चुकून अगोड झालाच; तर हाच गोड बेदाणा त्यातला गोडवा काही प्रमाणात वाढवतोच ना..  तीच छोटीशी पण महत्त्वाची जागा मिळवता आली पाहिजे. अगदी तसंच प्रत्येकाला जगता यायला हवं.. आपल्या आसपास कित्येक अशी माणसं असतात त्यांचा आदर्श घेऊन आपणही असंच काहीसे करू शकतो का ह्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुम्ही सर्वांनी ती जागा मिळवली आहे आणि म्हणूनच आजचं हे रोजच्या जीवनातील वेगळं पान आपल्या मित्रांचं कौतुक करण्यासाठी त्यांना दिवाळी भेट म्हणून देण्याचा हा माझा प्रयत्न लाडूवरच्या बेदाण्याएवढाच छोटा असला तरी गोड मानून घ्या.

            तुम्हा सर्वांना मनापासून सलाम आणि धन्यवाद. आपल्या सर्वांचे एकमेकांना असेच सहकार्य कायम लाभो अशी बाप्पा चरणी प्रार्थना.🙏🏻 अनवधानाने कुणाचाही उल्लेख राहायला नको म्हणून कुणाचेच नाव न घेता 'तुम्ही सर्व' असेच म्हटले आहे. माणुसकीने जोडलेल्या ह्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी हा शब्द फराळ आहे. तेव्हा प्रत्येकाने सारखाच वाटून घ्या. 'Joy of Giving' उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक गटाचं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद 🙏🏻आपल्याला साथ दिलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा. कायम असेच लाडूवरच्या बेदाण्यासारखा गोडवा वाढवत रहा आणि दुसऱ्यांच्या अंगणाताला प्राजक्तसडा बनून स्वतःचे जीवनही दरवळत रहा.. आनंदी रहा...सुरक्षित रहा.. 

🪔 शुभ दिपावली 🪔

🙏🏻धन्यवाद.

-✍🏻नंदिनी हाटकर.




Comments

Popular posts from this blog

रोज एक पान_१_"बकुळगंध......"

रोज एक पान_२_मोगरा फुलला...