रोज एक पान_४_ट्रेक आणि विटॅमिन सी
बऱ्याच दिवसांपासून नक्की काय आणि कशावर लिहावं हेच नेमकं ठरत नव्हतं.. म्हणून काही अर्धवट लिहून झालेल्या पानांवरून नजर फिरवली अन आठवणीतलं हे गंमतीशीर पान पूर्ण करायचं ठरवलं...
बरं आधी हे सांगा विटॅमिनच्या गोळ्या आणि वेगवेगळे काढे घेत आहात की नाही? की नव्याच्या नवलाईसाखं आता कोरोनाच्या बाबतीत घ्यायच्या खबरदारीचंही झालंय? रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून गेल्यावर्षीपासून कित्येकांना ह्या सगळ्याची सवयच झाली आहे. खबरदारी नक्की घ्यावी पण त्याचा अतिरेक नको... तुम्हालाही आता समुद्राच्या लाटेपेक्षा कोरोनाच्या लाटांच्या बातम्या ऐकण्याची सवय झालीच असेल ना. म्हणून फक्त विचारलं.... असो कोरोना आणि खबरदारी हा आजचा विषय नक्कीच नाही.... विटामिन सी वरून घडलेला एक किस्सा आठवला म्हणून तुम्ही विटॅमिन घेत आहात का विचारलं.. आणि आजचं पान हे विटॅमिन सी ने भरलेलं आहे. तेव्हा हेही विटॅमिन नक्की घ्या म्हणजे नक्की वाचा...
गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे सगळेच काहीसे वैतागले होते.. हळूहळू निर्बंध उठू लागले तसं कार्यालय पुन्हा सुरु झाले.. रेल्वे प्रवास सुरु झाला.. त्यामुळे किमान थोडेफार बाहेर जायला मिळत असल्याचे समाधान होते. तरी गर्दी टाळणेच बरे म्हणून कुठे फिरायला जाणं पण मनात असूनही टाळत होतो..
बघता बघता कोरोनाग्रस्त २०२० हे वर्ष निघून गेले.. अन नव उमेदीने नव्या वर्षाचे स्वागत झाले.. तो पर्यंत कोरोना संक्रमणाचे प्रमाण बऱ्यापैकी नियंत्रणात आले होते. एक वर्षाहून अधिक काळ कुठेही फिरण्यासाठी म्हणून गेलो नसल्याने अन अर्थात सह्याद्रीच्या कुशीत भटकंती केली नसल्याने लवकरात लवकर पुन्हां एकदा तरी ट्रेक ला जायचंच असा नवीन वर्षाचा आणखी एक संकल्प केला. आणि तो दिवस लवकरच आला आणि १७ जानेवारीच्या रविवारी ट्रेकला जायचं ठरवलं काही मित्रमंडळींनाही आम्ही कावनई ट्रेकला जाणार असल्याचं कळवलं... आमच्या बालपणापासूनच्या जवळच्या मैत्रिणीने आणि ३-४ वर्षांपूर्वी एका ट्रेक ला ओळख झालेल्या मित्राने लगेचच येण्याची तयारी दर्शवली... मध्यंतरीच्या वर्षांमध्ये आम्ही आणि त्यानेही वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक केले होते पण पुन्हा भेट झाली नव्हती.. आताच्या ट्रेकच्या निमित्ताने पुन्हा आम्ही एकत्र येणार होतो. 'मुंबई ट्रेकर्स' च्या चमू सोबत आम्ही निघालो.
रात्री मुंबईतून बस निघाली.. तसं माझ्या सोबत माझ्या बहीणी आणि आमची मैत्रीण होत्याच; पण हया ग्रूप सोबत बऱ्याच वर्षांनी ट्रेक ला जात होतो म्हणून सगळे नवखेच होते..ठाण्याला तन्मय चढला. अन मग काय कोणी तरी ओळखीचे सोबत असल्याने बरं वाटलं...
सोपे आणि छोट्या उंचीचे गड असल्याने त्रिंगलवाडी आणि कावनई असे दोन ट्रेक एकाच दिवशी करायचे होते.
त्रिंगलवाडी बद्दल थोडक्यात सांगायचे तर नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील ३२३८ फूट उंचीचा हा किल्ला आहे. ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी जैन लेण्या आहेत. त्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. (ही माहीती गूगलवरील एका सदरात वाचलेली आहे. संपूर्ण किल्ल्याची माहीती अर्थात गूगल वर मिळेलच आणि प्रत्यक्ष जाऊनही पाहता येईल.)
आम्ही पहाटे त्रिंगलवाडीच्या पायथ्याशी पोहोचलो..साधारण ४ /४:३० च्या सुमारास आम्ही चढाईला सुरुवात केली.. अन सूर्योदय होताना आम्ही डोंगरमाथ्यावर होतो... तिथे बसून सूर्योदय पाहण्याचे क्षण शब्दात वर्णन नाही करता येणार... ती मोहक पहाट डोळयांत साठवत, बरेच फोटो काढून मग गडउतार होऊ लागलो. कितीही वाटलं तरी तिथे जास्ती वेळ थांबणं शक्य नव्हतं.. कारण उतरल्यावर थोडी पेटपूजा करून आम्हाला कावनई किल्ल्याच्या चढाईला सुरुवात करायची होती... ट्रिंगलवाडीचा गड उतरल्यावर आम्ही आमच्या बस कडे आलो. सोबत आणलेला नाश्ता खाऊन पेटपूजा केली. त्यासाठी आम्ही जवळच असलेल्या झाडाच्या पारावर बसलो.. गप्पागोष्टींसोबत पेटपूजा तर झालीच.. पण त्या खेड्याचं ते रुप पाहून जरा मन खिन्नच झालं. समोरच असलेली झोपडीवजा पत्र्याची घरं, तिथली लहान मुलं कोंबडीच्या पिलांसोबत खेळत होती...तिथे तर विज पोहोचल्याची चिन्हंही दिसून येत नव्हती.. कसे राहत असतील हे ? जिथे कोरोनामुळे भल्याभल्यांना आर्थिक आणि आरोग्याच्या समस्यांशी सामना करावा लागला.. तेव्हा अशा छोट्याशा खेडोपाड्यातली परिस्थिती काय असावी.. मास्क, सॅनिटायझर ह्या आवश्यक गोष्टी त्यांच्या पर्यंत पोहोचल्या तरी असतील का? कोविड काळात इथे आणि अशाच डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी सर्व काही बंद असताना उदरनिर्वाह कसा केला असेल? आपण इथे घरबसल्या काढे, विटॅमिनची आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे घेणं असे अनेक उपाय करत होतो. ह्यापैकी ह्या लोकांना काय करता आलं असेल; असे अनेक विचार येत होते...
आत्तापर्यंत ऊन वाढू लागलं होतं... अजून एक गड बाकी होता.. तेव्हा तन्मय बस मध्ये जाऊन एक स्टीलची बाटली घेऊन आला.. बराच प्रयत्न करूनही त्याचं झाकण त्याला उघडता येत नव्हतं... त्याने मला सांगितलं जरा उघडून दे.. मी प्रयत्न केला मलाही ते झाकण उघडता आलं नाही.. आम्ही बोललो नाही उघडत तर आमच्या बाटलीतून पाणी घे. तेव्हा त्याने सांगितले की बाटलीत फक्त पाणी नाही तर लिंबू सरबत आहे. आता ऊन वाढू लागलं आहे तर सर्वांना बरं वाटेल म्हणून घेऊन आलो.. तसे एक एक जण त्या बाटलीचं झाकण उघडायचा अथक पण निष्फळ प्रयत्न करू लागले.... ते झाकण काही केल्या उघडत नव्हते म्हणून मग आम्ही सर्व तन्मयची थट्टा करू लागलो... पण आता कावनई गडाच्या दिशेने निघायचं असल्याने सर्व पुन्हां बस मध्ये बसलो आणि थोड्याच वेळात कवनाईच्या पायथ्याशी पोहोचलो..तिथे पोहोचे पर्यंतच्या प्रवासात आम्ही भाबड्या आशेने त्या बाटलीचे झाकण उघडण्याचा पुन्हां पुन्हां प्रयत्न करत होतो. तरी ते झाकण कोणाच्याही प्रयत्नांना दाद द्यायला तयार नव्हते.. तेव्हा वाढत चाललेल्या उन्हामुळे आता तर खरी लिंबू सरबताची गरज आहे. आणि काय रे तू कोणती बाटली शोधून आणलीस ? एवढं विटॅमिन घेऊन आला त्याचा काय उपयोग? अशी मस्करी करत तन्मयला पिडू लागलो.. आजच्या ट्रेक साठी जणू काय एक गंमतीचा एक विषयच आम्हाला मिळाला होता...
बस मधून उतरून पुन्हां एकदा चढाईचा श्रीगणेशा केला.. आता बऱ्यापैकी ऊन जाणवू लागल्याने सगळेच थोडे सावकाशीने चढाई करू लागले. दिड एक वर्षांनी ट्रेक ला आल्यामुळे थोडं दमायला होत होतं.. पण लवकरच आम्ही तो गडही पूर्ण सर केला.. माथ्यावर पोहोचलो तेव्हा त्या रखरखीत उन्हातही खरंच खूप शांत वाटू लागले.. तो परिसर बऱ्यापैकी मोठा होता. तिथे कवनाई देवीचे एक प्राचीन मंदिर होते.. त्या पुढेच एक छोटं तळं होतं.. ते पाणी खूपच थंड होते..म्हणून बराच वेळ तिथेच विसावलो.. त्या तळ्यात बरेच मासेदेखील होते. तेव्हा आमचा वेळ कसा गेला कळलचं नाही.. आलेला क्षीण निघून गेला..तिथूनही निघावंसं वाटत नव्हतं. उन्हातही तिथे खूप शांत आणि थंड वाटत होतं. त्या तळ्याकाठी बसून आम्ही पुन्हा छोटीशी पेटपूजा केली. तेव्हा पुन्हा तन्मयला त्या बाटलीवरून पिडू लागलो..
नंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली.. थोड्या वेळाने जेव्हा पायथ्याशी पोहोचलो. तेव्हा सगळे घामाघूम झालो होतो. जवळ असलेले पाणीदेखील एव्हाना संपले होते. कधी एकदा बसजवळ पोहोचतो आणि पाणी पितो असं वाटत होतं. पटापट जाऊन बस मध्ये बसलो. थोडे पाणी प्यायलावर खूप बरं वाटलं.. तेवढ्यात शेजारीच ठेवलेली तन्मयची ती सरबताची बाटली दिसली. आणि आम्ही आता तरी हे झाकण उघडेल का म्हणून पुन्हा चिडवू तर लागलो. पण खरंतर आता लिंबू पाणी मिळाले असते तर आणखी बरं वाटलं असतं.. म्हणून पुन्हां प्रयत्न करू लागलो. एव्हाना ज्यांना हा प्रकार माहित नव्हता त्यांनाही समजलं आणि ते भाबडेही ते झाकण उघडण्याचा प्रयत्न करू लागले. तरी ते झाकण काही केल्या उघडत नव्हते... मग सगळेच त्याला चिडवू लागले काही नसेल त्यात उगाच आपली मस्करी करत असेल हा.. तन्मय- अरे नाही, त्यात खरंच सरबत आहे म्हणून सांगू लागला.
सगळ्यांचे प्रयत्न करून झाल्यावर मागे माझ्याकडे ती बाटली पुन्हां दिली.. तसे सर्व बोलले राहू दे; आता तू घरी जाऊन पी. आता आम्ही दमलो आहे, त्यात पोटात कावळे ओरडू लागले आहेत. आता ती बाटली उघडायचा आम्ही पुन्हा प्रयत्न करणार नाही..तसा तोही गमतीने म्हणू लागला की, बरं आता जो कोणी ते झाकण उघडेल त्याला ते सगळं सरबत मिळेल. मग मी ही त्याला पुन्हां चिडवू लागले..." बघ हा आता जर का झाकण उघडलं तर तुला थोडंसंही सरबत देणार नाही.." त्यावर तोही स्वतःवरच हसत चालेल म्हणाला... तेवढ्यात सहज हे बोलता बोलता मी ते झाकण फिरवलं आणि जोरात ओरडलेच.... ये... finally झाकण उघडलं एकदाचं.. सर्व जण हसू लागले.. अन त्यातही - खरंच काही आहे का बघ आधी बाटलीत म्हणत तन्मयची आणखी मजा करू लागले.. तसा तो म्हणाला घे आता सर्व सरबत तुझं...
मग तरी त्याला दिलं तर नको तुम्हीच प्या म्हणून तोही चिडवू लागला. सगळ्यांनीच मग थोडं थोडं सरबत प्यायलं आणि त्यालाही दिलं.. खरंच खूप बरं वाटत होतं एव्हाना परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती... थोड्यावेळाने आम्ही जेवलो आणि पुन्हा प्रवास करून संध्याकाळी उशीरा घरी पोहोचलो..
प्रवासात तो मला बऱ्याचदा बोलत होता की आजच्या अनुभवावरही एक ब्लॉग लिह. तेव्हा त्याला गमतीने म्हणालेही - हो तर लिहायलाच हवं विटॅमिन सी साठी एवढे प्रयत्न कोणी केले नसेल ना कधी...
नंतर हे पान लिहायलाही घेतले पण अर्धवट राहून गेले...
लिंबामधून मिळणारं विटॅमिन सी जसं सर्वांनाच पोषक असतं; अगदी तसंच भटकंतीच्या अशा छोट्यामोठ्या आठवणींमधून मिळणाऱ्या आनंदाच्या विटॅमिनमुळे चेहऱ्यावर खुलणारं स्मित हे प्रत्येक भटक्यासाठी कायमच अमूल्य असतं... ह्या वर्षात आजपर्यंत केलेली ती एकमेव भटकंती होती आणि म्हणूनच आठवणीतले हे पान आवर्जून पूर्ण केले.....
कसे वाटले नक्की कळवा...
लवकर भेटूच मनात रुंजी घालणाऱ्या अशाच वेगवेगळ्या पानांवर...
धन्यवाद.
© नंदिनी हाटकर

खूपच सुंदर 😍😍 👌👌🙌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद तन्मय...
Deleteमस्त. एक छोटा, आयूष्यात घडणारा प्रसंग -- पण सुंदर मांडणीमूळे छान फुलला.
ReplyDelete