रोज एक पान_३_अनोळखी नाती





     नातं /नातेवाईक म्हणजे खूपच गुंतागुंत... नात्यांबद्दल काय बोलणार ? म्हटलं तर खूप नाही तर काहीच नाही...  नातं मग ते कोणतेही असो; कधी ते रक्ताचे असते तर कधी ते आपुलकीने जोडलेले असते... आता म्हणाल तरी नक्की कुठल्या नात्याविषयी बोलत आहे? असं ह्याबद्दल काय आणि सांगणार तरी किती? तसं बघायला गेलं तर खरंच ह्या विषयावर फार काही बोलण्यासारखं नाही..तरी जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात रुळलेली नात्यांची एक गंमत म्हणून आज हे वेगळं पान लिहिण्याचा हा प्रयत्न...


कुणी तरी म्हटलं आहे नाती समजायची नसतात; ती मानायची असतात...तर मग नातं अनोळखी कसं असेल.. मी म्हणते का नाही? आता हेच बघा.. आई- वडील आणि मूल, काका- काकी, मामा- मामी, मावशी, आत्या, आजी- आजोबा...ही सर्व ओळखीतली नाती असतात...तर अशी एक ना अनेक नाती सांगता येतील...दुसऱ्या बाजूने बघायचं तर नातं म्हणजे अशी ओळख जिथे फक्त रक्ताची नाती किंवा व्यक्तींची नावं पुरेशी नसून त्या व्यक्तीची वागणूक, कार्य, व्यवसाय आणि अशा किती तरी व्यक्तीला संबोधित करणाऱ्या गोष्टी.... पण ही ओळख अनोळखी असेल तर ??? तरी सुद्धा असे कित्येक नातेवाईक सापडतील हो..

 बरं सांगा, तुम्हाला नक्की किती नातलग आहेत ? कुणी सांगेल पन्नास एक  कुणी त्याहून जास्त... पण खरंच सगळेच नातलग असे कधी मोजता येतील का? तर नाही , खरंच नाही.. आणि तरीही आपण ह्या सगळ्यांसोबत कायमच असतो.. अगदी रोजच भेटतो म्हणायला हरकत नाही... तर असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या कडे एकही नातं नाही. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी त्यातला एखादा भेटतोच....

नाही कळलं? हा किस्सा ऐका.. मागे एका मैत्रिणीने वाटेत तिच्यासोबत घडलेला गमतीदार किस्सा मला सांगितला तो असा - की तिने येताना वाटेत एकाला थांबवून असं विचारलं -
"माफ करा, पण नक्की किती वाजले सांगाल का, दादा ? त्याचं काय आहे ना मी घड्याळ विसरले आणि फोनही बंद झाला आहे, कृपया सांगाल का ?" कारण ऐकून तरी अपेक्षित उत्तर मिळेल असं वाटत असतानाच हे महाशय ओरडून बोलले, "काही समजतं का तुम्हाला? दादा काय बोलता?" मी म्हटलं की, माफ करा आवडलं नसेल तर; पण मी घाईत आहे आणि पटकन तोंडून निघालं 'दादा'.. म्हणून बोलले. वेळ नसेल सांगायची तर राहूद्यात; नका सांगू. मी दुसऱ्या कोणाला विचारेन, एवढयाश्यासाठी ओरडता काय? काका/ मामा बोलण्यापेक्षा दादा बरं नाही का ? हे ऐकून त्या महाशयांच्या चेहऱ्यावरचे भावचं बदलले.. स्वतःची चूक त्याच्या लक्षात आल्याचं मलाही समजलं.. पण मीही त्याच्या अशा वागण्यावर थोडीशी चिडले असल्याने मी थांबले नाही,  निघून आले. अनोळखी माणसाचा ओरडा का ऐकू? ".
   
         गंमत आहे ना.. सहज कोणाला काय उद्गारावं कधी कधी खरंच समजत नाही..असे अनुभव कित्येकांना येत असतील.. तर अशा अनुभवांमध्ये समोरच्याला काय उद्देशायचं हाच कधी कधी न सुटणारा प्रश्न ठरतो... तर असे कित्येक नातेवाईक आपण नकळत जोडतो नाही. आठवा बरं...साक्षात प्रथमपूज्य श्रीगणेशाच्या वाहनाला उंदिरमामा म्हणतो...भाजी किंवा तत्सम इतर वस्तू खरेदी करताना आपण विक्रेत्याला/ विक्रेतीला दादा- ताई / मावशी - काका / आजी - आजोबा असंच संबोधतो ना. आपणच काय रस्त्यावर उभे राहून फूलं - फळं विकणारे विक्रेते अशिक्षित असले तरी ओ ताई/दादा फूलं घ्या ना असाच आवाज देतात ना.. रिक्षाचालकालाही आपण दादा / काका अशीच हाक मारतो. रस्त्यावर राहणाऱ्या गरजूंना मदत करतो त्यावेळी त्यांनाही आपण असाच आवाज देतो.. दैनंदिन जीवनात आपण जवळपास रोजच ह्या सर्वांना भेटत असतो तरी ह्यातले कितीजण आपल्या ओळखीतले असतात? तरी आपण त्यांना असं का संबोधतो ? तर माणूस म्हणून असलेला आदर हा त्यातून सहज व्यक्त होत असतो. आज जरी पत्रांची वाट पाहण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी पूर्वी पासून पत्र घेऊन येणारा पोस्टमन हा सर्वांचाच काका असतो ना... पोलसांचा कितीही धाक असला तरी हवालदारालाही मामा म्हटले जाते...आपल्या परिसरातले किंवा दारात येऊन कचरा गोळा करणारे सफाई कर्मचारी त्यांनाही आपण काका- मावशी/ताई असच संबोधतो...रखवालदार असला तरी त्यालाही काकाच म्हणतो...एवढचं काय लहानपाणापासून हक्काचा आपल्या सर्वांचा चांदोमामा असतोच की.....

     आणखी दाखले द्यायचे म्हटले तर; महाराष्ट्रभूषण स्वर्गीय बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आजवर अशाच अनेक नात्यांना आधार दिला..त्यांना आपल्या पायावर उभे रहायला मदत केली; आजही त्यांचे कुटुंबीय हा वारसा चालवत आहेत...
         ज्यांचं कुणी नाही अशा अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनाथांना पदरात घेऊन, प्रत्येकाची माय बनून आपूलकीची परिसीमा गाठणाऱ्या माऊली सिंधूताईं सकपाळांना मानाचा मुजरा.....
    
        अशी अनेक उदाहरणं आहेत.. जी माणूसकीच्या नात्यांनी जोडली आहेत...नात्यांचं दुसरं रुप म्हणजे ओळख आणि ओळख म्हणजे काय ? तर जसंजसं संपर्कात येत जातो तशी ती वाढत जाते. मित्रमैत्रिणींना आपण सहज अरे तुरे करतो ना ? का? कारण साधारण ते आपल्याच वयोगटातले आहे ह्याची कल्पना आपल्याला असते. पण काही वेळा आपल्यापेक्षा लहान किंवा मोठे असणाऱ्यांशी संपर्क येतो; मैत्री चांगली झालीच तर आपण ठरवतो एकामेकांना काय हाक मारायची.  किंवा समोरचा सांगतो कि एवढं काय, नावाने बोलाव; हरकत नाही.

          तर असाच काहीसा अनुभव मलाही सद्या येतो आहे.. असा एक गट जिथे अचानक कित्येकांशी ओळख झाली. गेल्यावर्षी एका कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व एकत्र आले.. एकत्र म्हणजे फक्त संपर्कात आले प्रत्यक्ष भेट नाही झाली.. सद्यस्थितीमुळे अनेक माध्यमांतून कोणाशीही अगदी जगाच्या कुठल्याही भागात संपर्क करणे सोपे झाले आहे. ह्यामुळे ज्यांच्या संपर्कात आलो त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आहे. कोणी शिक्षक तर कोणी डॉक्टर... असे बरेच... सैन्यदलात कार्य केलेल्या स्त्री-मेजरशी अशी अप्रत्यक्ष का होईना ओळख झाली हे आमचं भाग्य. तर असे अनेक कार्याने आणि वयाने मोठे असलेल्या व्यक्ती त्यांच्या अनुभवाने लिखाणाने खूप प्रेरित करत असतात.. तरी त्यांच्याशी बोलताना त्यांना काय संबोधायचं हा प्रश्नच असतो. मलाही कित्येकदा ताई, मॅडम असे बोलतात तेव्हा; असो...ह्याने काय फरक पडतोय हा विचार करते.. त्यांना तरी कुठे माहीत मी नक्की कोण आहे, त्यांच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे.. प्रत्येक जण आपापल्या परीने योग्य वाटेल अशी हाक मारतात. तर ह्यात काहीच गैर नाही आणि नावडण्यासारखंही नाही. 
           कित्येक जण बोलतात की मला फक्त नावाने संबोधले चालेल.. हेही बरोबर आहे.. अनोळखी असले तरी मित्रांसारखेच आहोत ना.. एकमेकांच्या  लिखाणाला प्रतिक्रिया देणं, काही सुचवणं, प्रत्यक्ष ओळखत नसतानाही जमेल तसं किंवा कधी वेळ काढून एकमेकांचं लेखन आवर्जून वाचणं; ही एका अर्थी अनोळखी मैत्रीचं निभावतो आहे ना... आता बघता बघता एक वर्षही झालं... जमेल तसा प्रत्येक जण एकमेकांना प्रतिक्रिया देत असतो.. कित्येकदा वाचताना हे जाणवतं की कुठेतरी आपल्या मनातलंच मांडले आहे. अनोळखी असलो तरी कुणाचाही आजवर कधी कुठल्याही प्रकारे  त्रास झाला नाही... प्रत्यक्ष कुणीही कुणाला भेटलेले नसले तरी प्रतिक्रिया देताना दादा / ताई  असे संबोधल्यावर मला नावानेच हाक मारा ना, मी लहान आहे, अरे बापरे मला असं 'जी' वगैरे बोलू नका...(मीही असं कित्येकदा सांगतेच की...) ही गंमत अनुभवायला वेगळीच मजा आहे...
         अनोळखी असले तरी हे एक शाब्दिक नाते खरंतर शब्दांत मांडता येणार नाही.. कायम माझ्या लिखाणाला मनापासून आशीर्वाद आणि दाद देणाऱ्या ह्या ग्रूपमधील सर्वांचीच  मी आभारी राहीन... तर आपल्या 'ब्लॉगलेखन' ग्रूपच्या येऊ घातलेल्या वर्षापूर्तीनिमित्ताने सर्वांना आपल्यातील अनोळखी नात्याच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा....

ह्या विषयावर सांगण्यासारखं फार काही नाही असं म्हणाले तरी हे पान पूर्ण भरलेच की... ओळख- अनोळख त्यातून फूलणारी अशीच अनेक नाती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी कायमच सर्वांना भेटत राहतील... तर ही अनोळखी गंमत कित्येकदा वेगवेगळ्या आठवणी देऊन जाते. तुम्हालाही असेच ताई/दादा/काका/मामा/मावशी/ आजी/आजोबा कुठेतरी भेटले असतीलच. ह्या निमित्ताने आठवलेही असतील. त्यांच्यासोबतची गंमतीदार आठवण नक्की सांगा.. प्रतिक्रियांची वाट पाहतेय...

पून्हा भेटूच पुढच्या पानावर....
धन्यवाद.
-नंदिनी हाटकर.

Comments

Popular posts from this blog

रोज एक पान_१_"बकुळगंध......"

रोज एक पान_२_मोगरा फुलला...