रोज एक पान_१_"बकुळगंध......"

              सकाळी लवकर  नेहमीप्रमाणे तिला जाग आली. ती अर्थात भ्रमणध्वनीच्या गजरामुळे...उठता क्षणी तिची नजर सवयीने तिच्या आवडत्या जागी गेली.. तिची हक्काची, शांतता आणि आनंद देणारी अशी जागा तिने खूप छान सजवली होती. वेगवेगळ्या फुलांची अन् वेलींची रोपटी ह्यांनी सजलेला तो कोपरा खूपच तजेलदार होता.. ताज्या टवटवीत नुकत्याच उमलू लागलेल्या विविध फुलांचा सुगंध... रातराणीचा अजूनही दरवळणारा मंद दरवळ... फुलांवर भिरभिरणारे मोहक फुलपाखरू, चिमणीपाखरांचा चिवचिवाट... दिवसाची सुरुवात करून देणारे रवीकिरण.. अन्  नभोवनात सुरु असलेला तो ऊन सावल्यांचा खेळ... रोज दिवसाची सुरुवात ह्याच तिच्या आवडत्या जागी  करायची हे तिने ठरवलेच होते. 
              उठल्यावर रोजच्याप्रमाणे आधी तिने तिच्या ह्या सर्व रोपट्यांना पाणी दिले आणि कायम तिला निर्व्याज, अमूल्य आनंद देतात म्हणून मनोमन त्यांचे आभार मानले... पाणी पिऊन तृप्त झालेल्या त्या हिरव्यागार रोपट्यांचा तजेला, मातीचा आणि फूलांचा तो मोहक दरवळ.... आहाहा... विलक्षण क्षण... लॉकडाऊन मध्ये फक्त हेच बदलले नव्हते... निदान सकाळ प्रसन्न करायला, मनाला ताजं आणि सकारात्मक ठेवायला तिची ही सवय तिला खूप उपयोगी ठरत होती..  अन् सोबत तिची 'ती' आठवण तिच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित आणायची....😊

           अन आताही नेहमीसारखेच 'त्या' आठवणीने तिच्या चेहऱ्यावर स्मित दरवळले...जणू 'तो दरवळ' कायमचा तिच्या मनी वसला होता...ती आठवण खरंच खूपच गंधित होती.. मनाने ती थेट 'त्या' शांत छायेखाली पोहोचली होती..दरवर्षी सुट्टीत किंवा गणेशोत्सवात गावी जाताना तिथले ते दुतर्फा हिरव्यागार वृक्षांनी सजलेले घाटरस्ते, मस्त थंडगार वारा.. जर पाऊस असेल तर आहाहा.. अजून काय हवं...त्याही पुढे मग गावच्या घरी पोहोचल्यावर कौलारू घर, अंगण, विहीर ह्यासर्व गोष्टींनी तर कुणीही आनंदीत होईल... मग ठरल्याप्रमाणे रोज 'त्या' ठिकाणी जायचा हट्ट आणि तिथे पोहोचल्यावर प्रफुल्लित करणारं ते वातावरण.. चोहोबाजूंनी नजर जाईल तिथवर घनदाट हिरवळ तिथल्या देवीच्या मंदिराभोवतीचा बऱ्यापैकी मोठा परिसर कायमच दरवळलेला असायचा.. तिथे असणारा एक भला मोठा बकुळवृक्ष, त्याची भोवताली पसरलेली शांत सावली...त्याचा बुंधा तर इतका मोठा होता की ३-४ जणांच्या हातांची साखळी देखील झाडाला मिठी मारायला कमी पडेल...पावसाळ्यात जरी तिथे मातीचा काला असला तरी पावसाने चिंब भिजून तरारलेला तो हिरवागार टवटवीत वृक्ष म्हणजेच  निसर्गाचे हे सुंदर लेणे साजिरे दिसायचे.  तर फुलांच्या बहराच्या मोसमात तो परिसर बकुळ फुलांनी सजलेला असायचा..तेव्हा कधीही जा; तो वृक्ष फुलांचा सडा घालून आपल्या मायेच्या छायेत स्वागत करायला तयार....अगदी भरपूर फुलांनी टवटवीत असायचा...😊
        तिथे गेलो की ती फुलं गोळा करायची मजाच वेगळी अन सर्वात जास्ती तो मोहून टाकणारा बकुळगंध.... त्या फुलांचं एक वैशिष्ट्य असं की ती कितीही सुकली तरी त्याचा सुगंध कमी होत नाही.  त्यापुढे बाकी सर्व फिके पडेल.. 
    तिथे गेल्यावर तिथून तिचा पायच निघायचा नाही... थंड शांत अशी ती आठवण.....

       कसल्याशा आवाजाने ती भानावर आली... चला सगळं आटपून निघायला हवं म्हणून ती तयारीला लागली... 

       कोरोना संकट अजूनही पूर्ण सरले नव्हते... तोच निसर्ग वादळाने महाराष्ट्राला आपले रूप दाखवले.. बऱ्याच ठिकाणी ह्या वादळामुळे खूप नुकसान झाले... काही दिवसांनी तिची मैत्रीण महत्त्वाच्या कामानिमित्त गावी जाऊन आली. तेव्हा तिने त्या मंदिर परिसराचे छायाचित्र पाठवले... ते बघून एकदम जवळचं काही हरवल्या सारखा तिच्या काळजाचा ठोका चूकला. सदा बहरलेला अवाढव्य आणि गेल्या १०० वर्षांपेक्षा जास्ती काळ दिमाखात उभा राहून भलीमोठी सावली देणारा तो बकूळवृक्ष तिथे नव्हताच... निसर्ग चक्रीवादळाने ह्या अवाढव्य वृक्षालाही मान वाकायला लावली होती...वादळाचा तडाखा इतका होता की, कणखर असे ते सुंदर वृक्ष मूळासकट उपटून पडले आणि इतक्या वर्षांपासूनची ती मायेची थंडगार सावली तिच्या गावाने कायमची गमावली...  हे बघून तिला विश्वासच बसत नव्हता... त्या वृक्षाच्या छायेत घालवलेल्या बालपणीच्या आठवणी दाटू लागल्या. इथे मुंबईत क्वचितच कधी ही फुलं किंवा ह्या फुलांचा गजरा विकताना दिसायचे. पण हक्काचा वाटणारा तो महावृक्ष आता कधीच दिसणार नाही; ह्याचे तिला खूप वाईट वाटत होते. त्याच्या सयीने मन खिन्न झाले.... 😔

       बघता बघता काही दिवस सरले...  घरातली कामे उरकून रोजच्यासारखीच धावतपळत ट्रेनमध्ये चढली.. लॉकडाऊन संपून हळूहळू सर्व सेवा सुरळीत होऊ लागल्या होत्या.. तेव्हा ट्रेनला सुरुवातीला कमी गर्दी असली तरी कालांतराने पूर्वीसारखी गर्दी होऊ लागली होती... सर्वत्र वाढू लागलेली गर्दी, रोजचा प्रवास, सोबत विषाणूंपासून संरक्षण म्हणून सतत चेहऱ्यावर असलेली मूखपट्टी... आताशा सर्वांप्रमाणे तिलाही सततच्या मूखपट्टीचा थोडा  कंटाळा आला होता... कधी सर्व संपूर्णपणे पूर्ववत होइल असं तिला वाटत होते... ही घुसमट जाऊन कधी एकदा मोकळाश्वास घेता येईल असं प्रत्येकालाच वाटू लागले होते... 

      अशीच एकदा संध्याकाळी घरी जाताना ट्रेन मध्ये चढली.. हाती सामान, घामाने हैराण अशी ती, हवा येईल म्हणून दरवाज्याजवळ उभी राहीली.  थकल्यामुळे पाणी पिण्यासाठी मुखपट्टी काढली. थोड्या मोकळ्या श्वासाने तिला बरे वाटलेच तोच वाऱ्याची झुळूक आली; अन त्या सोबत एका सुंदर सुवासाने तिला मोहून टाकले.. २-३ वर्षांनी हा दरवळ पुन्हां प्रत्यक्ष अनुभवत होती... मागे वळून पाहिले तर तो दरवळ खरोखरच ओळखीचा होता... तिथे बसलेल्या एका स्त्रीने जो गजरा केसात माळला होता; त्याचाच हा दरवळ होता.... इतक्या दिवसांनी फक्त दरवळच नाही तर त्या फुलांना पाहून मन खूप तृप्त झाले...अन  पुन्हां 'त्या' आठवणीने तिच्या चेहऱ्यावर तेच स्मित उमटले....मुखपट्टी पुन्हां घालण्याआधी तिने मन भरून ते क्षण अनुभवले... तो सुगंध मनात साठवून घेतला..😊😇
हा तोच तो...  
तिच्या आठवणीतला दरवळ..... 
"बकुळगंध......"

- © नंदिनी हाटकर.


छायाचित्र सौजन्य: गुगल




Comments

  1. Shraddha Kulkarni25 May 2021 at 07:39

    Khup chhan

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद श्रद्धा... 🙏

      Delete
  2. खूपच सुंदर.... मन त्या बकुळवृक्षा कडे पोहचले... आपण भावंडे ती फुले वेचतानाची आठवण येऊन गेली. ते झाड गेले असं बोलायलाही कसंतरी वाटते😥
    पण तू ही उत्तम आठवण छान शब्दबद्ध केलीस...👏✍️अशीच लिहीत रहा..

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद... खरचं त्या बकुळवृक्षाची आठवण कधीच विसरता येणार नाही.. आणि आता ह्या शब्दांतून त्याचा गंध कायम आपल्या मनी दरवळत राहो हीच इच्छा...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

रोज एक पान_२_मोगरा फुलला...